खडकी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाध्यक्ष सुनील चोभे यांचा सन्मान
खडकी | प्रतिनिधी
नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुनील चोभे यांचा खडकी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा आज खडकी, तालुका अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला.
पत्रकार सुनील चोभे यांची नुकतीच नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच दुर्लक्षित घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिक भूमिका घेतली आहे. निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता हीच त्यांची ओळख असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे.
त्यांच्या या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल खडकी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांचा सन्मान करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
या सन्मान सोहळ्यास सचिन कोठुळे (संचालक, घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना), मुख्याध्यापक राजकुमार चोभे, गोरख कोठुळे (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), दरेकर सर, रावसाहेब कोठुळे, चंद्रकांत कोठुळे (मेजर), पवार सर, कोतकर मॅडम यांच्यासह शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुनील चोभे यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षपदाच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व पत्रकारितेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी ते निश्चितच प्रयत्नशील राहतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
खडकी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाध्यक्ष सुनील चोभे यांचा सन्मान


