संदेश कार्ले यांच्या सतर्कतेमुळे काळेवाडीचा बागायतदार तलाव फुटता फुटता वाचला*

संदेश कार्ले यांच्या सतर्कतेमुळे काळेवाडीचा बागायतदार तलाव फुटता फुटता वाचला

अहिल्यानगर :
शनिवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर तालुक्यातील हिवरे झरे, बाबूर्डी बेंद, काळेवाडी परिसर जलमय झाला. पन्नास वर्षांपूर्वी उभारलेला काळेवाडीतील भैरवनाथ मंदिराशेजारील बागायतदार तलाव या वेळी तुडुंब भरला. मात्र, तलावाच्या मधोमध रानडुकरांनी पाडलेल्या होलमधून पाणी बाहेर पडू लागल्याने तलाव फुटण्याची भीषण शक्यता निर्माण झाली. काही क्षणांतच शेकडो एकर शेती, जनावरे आणि २५ ते ३० घरे धोक्यात येणार होती.

हे संकट लक्षात येताच गावकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी व पाटबंधारे विभागाला कळविले. मात्र, तातडीने मदत मिळण्याची चिन्हे न दिसल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना मदतीचा धावता संदेश दिला.

कार्ले यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत तात्काळ जेसीबी घटनास्थळी पाठवली. स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून तलावाच्या मधोमध पडलेले होल बुजविण्यात आले तसेच सांडव्यातील पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात आला. आणि एका मोठ्या अनर्थापासून गाव वाचले.

या वेळी उपस्थित रोहिदास भांडवलकर, रघुनाथ काळे, मुकेश काळे, विजय भापकर यांच्यासह शेतकऱ्यांनी कार्ले यांचे मनापासून आभार मानले.

शेतकऱ्यांची हळहळ : संपूर्ण कर्जमाफी हवी
अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. पिके पाण्यात बुडाली, शेतजमीन उपाळली. “हातातोंडाचा घास हिरावला गेला… शेतकरी जगणार तरी कसा?” असा जळजळीत प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“…तर आज मोठा अनर्थ घडला असता” : संदेश कार्ले
या घटनेविषयी बोलताना शिवसेना नेते व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले की,
“शेतकरी आधीच कांद्याला, दुधाला योग्य भाव न मिळाल्याने पिचला आहे. त्यात पावसाने खरीप हंगामच वाहून गेला. तलाव फुटण्याची माहिती समजताच तो माझ्या गटात आहे की नाही हे न पाहता तातडीने कारवाई केली. कारण जीव वाचवणे, शेती वाचवणे हाच आपला धर्म आहे. जर वेळेत दुरुस्ती केली नसती तर आज मोठा अनर्थ घडला असता.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *