पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाने हिवरे बाजारचा आमूलाग्र विकास
उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांचे प्रतिपादन
नगर : प्रतिनिधी
“सन २०१३ मध्ये प्रशिक्षणानिमित्ताने हिवरे बाजारला भेट दिली होती. त्यावेळी आणि आजच्या गावात जमीनअस्मानाचा फरक आहे. तेव्हा विकास प्रक्रिया सुरु होती, पण आज पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समतोल व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हिवरे बाजारमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे,” असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले.
‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या पर्यावरणपूरक संकल्पनेतून हिवरे बाजार येथे १८०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. मातृस्मृती वनमंदिर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात डॉ. पाटील यांच्या हस्ते सुपारीच्या झाडाचे रोपण करण्यात आले.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, “यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र, ग्रामसचिवालय, ग्रामसंवाद यांसारख्या पायाभूत सुविधा आज गावात उभ्या राहिल्या आहेत. गावातील पशुवैद्यकीय दवाखानाही आधुनिक, सुसज्ज आणि निसर्गरम्य आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.”
कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावात राबविल्या जाणाऱ्या जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण आणि अन्य उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारने संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणास्थान निर्माण केले आहे.ग्रामस्थांच्या वतीने पवार यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, के.बी.गुरव उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, डॉ. विजय गायकवाड, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर सर, रोहिदास पादीर, अशोक गोहड, संजय पवार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


