माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली – काशिनाथ दाते
पारनेर/ प्रतिनिधी –आज दुपारपासून पारनेर तालुक्यात सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु सदर बातमी ही फेक असल्याची माहिती महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांनी वीरभूमीच्या प्रतिनिधीला दिली. याबाबतची माहिती अशी की, आज बुधवारी एका टिव्ही चॅनलवर अशी बातमी दाखवली जात होती की, पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या ऐवजी विजय सदाशिव औटी यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. अशी ही बातमी मोठ्या प्रमाणात सर्वत्र फिरवली जात होती. सदर बातमी सगळीकडे झाल्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये होते. मात्र यानंतर स्वतः उमेदवार काशिनाथ दाते यांनी एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्या टि व्ही चॅनलची बातमी फेक असल्याचे समोर आले.
चौकट – पक्षाचा ए बी फॉर्म माझ्याकडेच पारनेर-नगर मतदारसंघातील महायुतीच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व इतर पक्षातील सहकारी मित्रांना सुचित करण्यात येते कि, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची प्रचारात दिसून येत असलेली आघाडी, जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता या मतदारसंघात परिवर्तन हे अटळ असल्याची विरोधकांची खात्री झाली असून, त्यातून येत असणाऱ्या नैराश्यातून महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. चुकीच्या पद्धतीने एडिटिंग करून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत कोणीही चिंता करू नये. आपल्या उमेदवारी नामनिर्देशन पत्रासोबतच पक्षाचा ए.बी. फॉर्म जमा केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट या राष्ट्रीय पक्षाचे आपणच अधिकृत उमेदवार आहोत. याबाबत कोणीही मनामध्ये शंका आणू नये. काशिनाथ दाते
महायुतीचे अधिकृत उमेदवार