वाळकी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित – डॉ अनिल ससाणे.*
प्रतिनिधी:- वाळकी येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं प्राथमिक आरोग्य केंद्र आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आलं आहे. पावसामुळे आरोग्य केंद्रात चिखल, पाणी आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. मात्र स्थानिक नागरिकांचे श्रमदान आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्राची स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यात आले.
आरोग्य अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंद्रात झालेल्या नुकसानाची झळ दूर करताना आमच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी देखील मोठ्या उत्साहाने श्रमदानात भाग घेतला. त्यामुळे हे केंद्र उद्यापासून (३ जून) पुन्हा पूर्ववत वैद्यकीय सेवा देऊ लागणार आहे.”
साफसफाईसोबतच आवश्यक ती औषधे, उपकरणे व सुविधांचे पुन्हा एकदा व्यवस्थापन करण्यात आले आहे. सध्या परिसरात पावसामुळे पाणीजन्य आजारांची शक्यता लक्षात घेता हे केंद्र कार्यरत होणे गरजेचे होते, याची जाणीव ठेवून प्रशासनाने तत्काळ पावले उचलली.
या वेळी ग्रामस्थांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय ठरला असून, ग्राम आरोग्य व्यवस्थेचा पुनर्विकास हा सामाजिक एकतेचा उत्तम उदाहरण ठरला आहे.


