गुंडेगाव यात्रेतील कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला
*प्रतिनिधी* :- गुंडेगाव (ता. अहिल्यानगर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. शेवटची मानाची कुस्ती करमाळ्याच्या मल्लावर चितपट मात करत पै.काका पवार व युवराज पठारे, अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे तालीमचा मल्ल पै.चैतन्य शेळके भैरवनाथ केसरी गदेचा मानकरी ठरला यावेळी मानकरी पैलवान चैतन्य शेळके यांना मानाची चांदीची गदा व २१ हजार रुपये रोख बक्षिस दिले.
कुस्त्यांच्या डावपेचांनी मल्लांनी उपस्थितांची वाहवाह मिळवली. एकशे एक रुपयापासून तर एकवीस हजार रुपया पर्यंन्त लावण्यात आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगला होता. या निकाली कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटले. हगाम्यात जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते. तर पै.अशोक पालवे , पै.सौरभ शिंदे, पै. श्याम गव्हाणे, पै.अनिल ब्राह्मणे या मल्ल्यांच्या चितपट कुस्त्या पाहायला मिळाल्या यावेळी ग्रामस्थांनी मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव केला. कुस्ती आखाड्यात पंच म्हणून पै. बाळासाहेब भापकर, पै.बापुसाहेब चौधरी पै.रामदास हराळ, पै.नारायण हराळ,पै.गोरख कोतकर यांनी काम पाहिले. तर आलेल्या मलांचे स्वागत भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले.


