स्वत:च्या क्षमतेतूनच बाहय परिस्थितीत अमुलाग्र बदल होऊ शकतो:- मा.श्री.सुरज मांढरे आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य
हिवरे बाजार :-आदर्श गाव हिवरे बाजार येथे उभे राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामिण विकास प्रशिक्षण केंद्राची आज श्री.सुरज मांढरे आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १५ मे २०२५ रोजी पाहणी केली.आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांनी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाच्या प्रगतीची माहिती दिली.प्रशिक्षण केंद्राच्या पाहणी केल्यावर बोलताना श्री मांढरे पुढे बोलताना स्वत:च्या क्षमतेतूनच बाहय परिस्थतीत किती आमुलाग्र बदल होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.हिवरे बाजार येथे जे ग्रामविकासाचे प्रयोग झाले आहेत ते प्रयोग पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात.या गावात राबविलेल्या प्रयोगांना एक औपचारिक अध्यासन ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने मिळत आहे.हिवरे बाजार गावातील प्रयोग यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्य,राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी मदत होईल याचा मला विश्वास आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले भौगोलिक,सामाजिक आणी आर्थिक परिस्थती अतिशय बिकट असतानाही पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारकरांनी जो गावाचा कायापालट घडवून आणला.ते राज्यातील नव्हे तर देशातील इतर गावांनी अनुकरण करावे असे आदर्श उदाहरण आहे.हिवरे बाजारने कृषीविकास ,निसर्ग ,शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रात विकासाची सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे याचा मला विशेष आनंद होत आहे.पोपटरावांनी मला गावाची पूर्वीची दुरावस्था आणी लोकसहभागातून गावाचा झालेला कायाकल्प याची सर्व माहिती दिली.हिवरे बाजारच्या बद्दल आदर आणि अभिमान निर्माण झाला.
आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष डॉ पोपटराव पवार यांनी आयुक्त कृषी सुरज मांढरे यांचे स्वागत केले.प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक सहयोगाचा व प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी पुणे जिल्हा बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण,अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आदर्श गाव योजनेचे कृषी उपसंचालक वसंत बिनवडे,प्रज्योती बिचकुले तंत्र अधिकारी आदर्श गाव व इतर अधिकारी उपस्थित होते.


