तरससदृश प्राण्याच्या हल्ल्यात ५५ मेेंढयांचा मृत्यू
आ. नीलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
शेवगांव तालुक्यातील दहिगांव ने येथील घटना
शेवगांव : प्रतिनिधी
तरससदृश प्राण्याने मेंढपाळाच्या वाडयावर हल्ला करून मेेंढयांना लक्ष्य केल्याने ५५ मेंढया मृत्यूमुखी तर १० मेंढया अत्यावस्थ आहेत. आ. नीलेश लंके यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पिडीत मेंढपाळाशी संवाद साधत दिलासा दिला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून पिडीत मेंढपाळास तातडीची मदत करण्याची मागणी केली.
जिल्हयातील शेवगांव तालुक्यातील घेऊरी, दहिगांव ने या गावातील धनगर बांधव अशोक बाबूराव क्षीरसागर यांच्या मेंंढयांच्या वाडयावर २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तरससदृश प्राण्याने हल्ला केल्याने तब्बल ५५ शेळया मृृत्यूमुखी पडल्या तर १० शेळया अत्यावस्थ आहेत.
नीलेश लंके यांचे सहकारी दहीगांव ने भागात असताना या मेंढपाळावर ओढावलेल्या संकटाची माहीती त्यांना समजली त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आ. नीलेश लंके यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला. लंके यांनी पिडीत मेंढपाळ बांधवाशी चर्चा करून त्यांना धीर दिला. तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशीही लंके यांनी चर्चा करून पंचनामे करून तात्काळ अहवाल पाठविण्याच्या सुचना दिल्या.
अशोक श्रीरसागर हे अत्यंत गरीब असून मेंढी पालन करून ते त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. जंगली प्राण्याच्या हल्ल्यात मोठया संख्येने मेंढया मृत्यूमुखी पडल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने त्याची गंभीर दखल घेउन त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी आ. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.