-प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार
-प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास आश्वासन
अहिल्यानगर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालनालय , पुणे येथे प्रत्यक्ष भेट घेतली . त्यावेळी राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने शिक्षण संचालनालयाकडून सोडवण्यात येणार असल्याबाबत स्पष्ट आश्वासन दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संयुक्तचिटणीस राजेंद्र निमसे यांनी दिली .
या प्रलंबित प्रश्नांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक शिक्षकांचे वेतन दीपावली पूर्वी अदा करावे , दीपावली अग्रीम दीपावलीपूर्वी मिळावा,राज्यातील विविध जिल्ह्या-जिल्ह्यातील शालेय कामाच्या दिवसांमधील विषमता दूर करणे कामी संघटनेकडून शिक्षण संचालनालयास प्राप्त झालेल्या छत्तीस जिल्ह्यांच्या सुट्टयांच्या अभिप्रायानुसार शासनास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करणे, तालुकास्तरीय समायोजन होते वेळी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे झालेल्या समायोजन बदलीमध्ये संबंधित शाळेच्या विद्यार्थी उपस्थिती तपासणीनंतर पुनश्च संबंधित शाळेत संबंधित शिक्षकाची समायोजन बदली होणे ,अहिल्यानगर जिल्हा परिषदेने शासकीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी ऑक्टोबर महिन्यासह पुढील चार महिन्यांच्या प्रत्येक रविवारी इयत्ता पाचवीचे सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांमार्फत विनापरवाना वाहतुकीने सुरक्षितपणे संबंधित परीक्षा केंद्रावर मुलांना पोहचविणे , तसेच शासनाचे कोणतेही निर्देश नसताना शनिवार व रविवारच्या पाच सार्वजनिक सुट्टयांचा अपव्यय करणे , केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती करणे आदी विषयांबाबत सांगोपांग चर्चा झाली
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी अतिशय खुमासदारपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन लवकरच सर्व प्रश्नांचा निपटारा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे संघटना प्रतिनिधी यांचे समाधान केले .
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्य संयुक्तचिटणीस राजेंद्र निमसे , राज्य मध्यवर्ती शिक्षक समन्वय समितीचे राज्याध्यक्ष केशव जाधव ,संघाचे नगर जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर , इब्टाचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .