पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कार वितरण
केंद्रीय संरक्षण मंत्री ना.राजनाथ सिंह, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार -डॉ. खासदार सुजय विखे पाटील
अहमदनगर -सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कार वितरण. केंद्रीय संरक्षण मंत्री ना.राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. ९७ व्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या समारंभास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागासमोरील प्रांगणात गुरुवार दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.वा. या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील डॉ.निशिकांत ठकार यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ.शैलजा बापट यांना या वर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, विशेष साहित्य पुरस्कार विश्वास वसेकर यांच्या कविता संग्रहास देण्यात येणार असल्याचे डॉ.विखे पाटील म्हणाले.
यावर्षीचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार कलेच्या सेवेबद्दल वसंत अवसरीकर, समाज प्रबोधन पुरस्कार समाज प्रबोधन पत्रिका ( अशोक चौसाळकर) यांना तर नाट्यसेवेबद्दलचा पुरस्कार जळगाव येथील शंभू पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. डॉ.विखे पाटील अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीरामपूर येथील डॉ.शिरीष लांडगे यांच्या ज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथास आणि अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार विकास पवार यांच्या भंडारदरा धरण शतकपुर्ती प्रवास या पुस्तकास देण्यात येणार आहे. प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार कोल्हार येथील डॉ.अशोक शिंदे यांच्या कविता संग्रहास देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यंदा प्रथमच या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्हणूनही राज्यात साजार केला जात असल्याने यंदाच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची असलेली उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे खा.डॉ.विखे पाटील म्हणाले. प्रवरानगर येथील भव्य अशा प्रांगणात या कार्यक्रमाची जय्यद तयारी प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आली असून, देशाचे संरक्षण मंत्री ना.राजनाथ सिंह प्रथमच जिल्ह्यामध्ये असल्याने त्यांच्या स्वागताचे नियोजन सुयोग्य पध्दतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असल्याचे खा.डॉ.विखे पाटील म्हणाले.
या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास व शेतकरी दिनास शेतकरी, कार्यकर्ते आणि साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.