बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास पाच कोटींचा निधी मंजूर: खा. सुजय विखे पाटील

 सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास पाच कोटींचा निधी मंजूर: खा. सुजय विखे पाटील

खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश 
नगर येथील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
सावेडी बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवासी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात या ठिकाणी नागरिकांना गाडीतून उतरणे देखील अशक्य होत असून आवारात पाणी साचल्याने प्रवाशांना आणि वाहनांना ये-जा करण्यास समस्या उद्भवत होती. 
दरम्यान सदरील परिस्थिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास येताच त्यांनी योग्य पाठपुरावा करून सदरील बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी मागणी केली होती. दरम्यान सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास सुमारे पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास लेखाशिर्ष 6 फ अंतर्गत प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. 
या रकमेतून सावेडी येथे भव्य असे बसस्थानक उभारण्यात येणार असून यामध्ये तळमजला, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटींग, रेन वॉटर हारवेस्टिंग, काँक्रीटीकरण आदी गोष्टींचा समावेश असेल. लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे बसस्थानक निर्माण होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
सदरील बसस्थानकाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार..
सदर बसस्थानकासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष अभयतात्या आगरकर आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे तसेच नगरसेवक व भाजप व महायुतीचे पदाधिकारी यांनी खा. विखे व आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *