रुईछत्तिशी येथे पावसाची जोरदार हजेरी..
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती.खरिप पिके पूर्णपणे उन्मळून जाण्याच्या मार्गावर होती.काही पीके तर मातीमोल देखील झाली.जिरायती भागातील पिके पूर्णपणे कोसळून गेली.बाजरी , मका , सोयाबीन , कांदा पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने गैरहजेरी लावली.गेल्या एक महिन्यापासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.१० जुलै पासून पावसाने पाठ फिरवली होती.तब्बल ५० दिवसानंतर आलेला पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे.सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरिपाची पिके पेरली पण पाऊस लांबणीवर गेल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता.पिकांची पूर्णपणे मशागत होऊन पीके उभारी धरू लागली होती.विहिरी , कूपनलिका यांनी देखील तळ गाठला होता.आज झालेल्या समाधान कारक पावसाने बळीराजा चांगला सुखावला आहे.उभा असणारी खरिपाची पिके थोडेफार तरी उउत्पन्न घेऊन हातात पडणार आहेत.
कडक उन्हामुळे अनेक पिकांची वाताहत झाली होती. पिके सुकून चालली असताना पावसाने लावलेली हजेरी वरदान ठरली आहे. रूईछत्तिशी परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले होते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.चारा डेपो किंवा छावण्यांची मागणी जोर धरु लागली होती. आठ दिवस पाऊस आला नसता खरिपाची पिके पूर्णपणे जळून जाण्याच्या अवस्थेत होते. रुईछत्तिशी परिसरात झालेला समाधानकारक पाऊस शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा आहे.सोयाबीन , कापूस , मका , बाजरी , कांदा या पिकांचे थोडेफार उत्पन्न आता पदरात पडणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.रब्बी हंगाम देखील पुढील पावसाने फुलणार आहे.पुढे चांगला पाऊस झाला तर पोळ्यानंतर गावरान कांद्याची रोपे टाकली जाणार आहेत. पावसाशिवाय काही खर नाही अशीच हाक या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.