रुईछत्तिशी गावातून जाणाऱ्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य , रस्ता डांबरीकरण होण्याची मागणी.
रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्गाचे काम जोरात चालू आहे.मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रुईछत्तिशी येथून जातो. बायपास बाहेरून गेला असल्याने सध्या गावंतर्गत मार्गावर महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.मार्गावर दररोज पाणी मारले जाते व पुन्हा गाड्या गेल्या की धुळीचे साम्राज्य निर्माण होते.सध्या सर्व प्रकारची स्थानिक वाहतूक याच मार्गावरून जात असल्याने प्रचंड त्रास ग्रामस्थ व व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.गावात मोठे महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ रस्त्यावर असते.खडी टाकून मार्गाचे अस्तरीकरण करण्यात आले आहे परंतु हे अस्तरीकरण वाहनाच्या वर्दळीमुळे लगेच उघडे पडते.सबंधित ठेकेदारास वारंवार सूचना देऊनही कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.रस्ता विभागाचे कार्यकारी संचालक यांना रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू केले नाहीतर महामार्गावर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्त्यावरून जाताना धूळ डोळ्यात जाते. धुळीचे कण श्वसना बरोबर शरीरात जातात त्यामुळे डोळ्यांचे आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत. रस्त्यावर असणाऱ्या पुलाच्या कडा पडल्या आहेत.शाळेतील मुलांना धोका निर्माण झाला आहे.आसपासच्या दहा ते बारा गावांची वर्दळ गावात असल्याने रस्ता लवकर डांबरीकरण होणे गरजेचे आहे.बाह्यवळण रस्ता पूर्णपणे सुरू झाला तर गावातून जाणाऱ्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहील म्हणून हा रस्ता लवकर डांबरीकरण होणे गरजचे आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे.