येणाऱ्या निवडणुकांमध्ये चारित्र्यसंपन्न व सुशिक्षित व्यक्तीला निवडून द्या: खा.डॉ. सुजय विखे पाटील
श्रीगोंदा तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजय विखे व आमदार बबनदादा पाचपुते यांच्या उपस्थितीत संपन्न..
काष्टी ( प्रतिनिधी)
येणारा काळ हा निवडणुकीचा आहे, या कालावधीमध्ये चारित्र्यसंपन्न व सुशिक्षित असा व्यक्ती निवडून द्या. याचा फायदा सर्वसामान्य माणसाला व पुढील पिढीला होईल, असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
काष्टी येथे ते विविध विकास कामांचा शुभारंभ व साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास प्रतिभाताई पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, भगवान पाचपुते, अरुण पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
जो व्यक्ती सुशिक्षित असेल व सर्व क्षेत्रातील ज्याला जाण असेल अशा हुशार आणि अभ्यासू व्यक्तींनाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये साथ द्या. त्यामुळे समाजाची प्रगती होईल व समाज पुढे जाईल असे देखील मत यावेळी खासदार सुजय विखेंनी व्यक्त केले.
पुढे खासदार विखे म्हणाले की, ज्येष्ठ आमदार बबनदादा पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये रस्त्यांसाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणला. या वयातही इतक्या तत्परतेने तालुक्यात जनतेसाठी काम करणारा नेता पाहिला नाही. पाचपुते साहेबांची जिद्द, चिकाटी व काम करण्याची पद्धत ही वेगळीच आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, निवडणूक अजून लांब आहे. कोण विरोधक आहे याचीही आपल्याला कल्पना नाही. कोण चर्चेत आहे, यापेक्षा मला जनतेसाठी कसं चांगलं काम करता येईल याकडे मी जास्त लक्ष देतो. “जय श्रीराम” असे उत्तर दिले व जनतेच्या आशीर्वादावरच सर्व काही शक्य आहे. जनतेसाठी प्रामाणिक काम करत राहायचं, जनता साथ देत राहते असे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
यासोबतच २२ जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करावी. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची सकाळी प्रभातफेरी काढून रामनामाचा जयघोष करावा. तसेच सर्व घरांवर गुढ्या उभारून भगवे ध्वज फडकवावेत व दिवे लावावेत आणि महिला मंडळाच्या माध्यमातून सामूहिक रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखेंनी जनतेला केले.
याप्रसंगी वैभव पाचपुते, राजेंद्र पाचपुते, मोहनराव दांगट, सुनील दरेकर, मदनराव गडदे, सुवर्णाताई पाचपुते, बबनराव राहीज, कैलासराव गवते, अशोकराव गांगड, महेशराव दरेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.