रब्बी हंगामातील पिके आली काढणीला , उन्हाचा तडाखा वाढला , तीव्र पाणीटंचाई…
देवीदास गोरे
रुईछत्तिशी – रब्बी हंगामातील हरभरा , गहू , ज्वारी पिके काढणीला आली आहेत.सध्या उन्हाचा देखील तडाखा वाढल्याने पाणी पातळी खालावली आहे.कांदा पिकांना पाण्याची गरज असून अचानक पाणी पातळी खाली गेल्याने उत्पादन क्षमता घटणार आहे. पावसाळ्याच्या शेवटी पाऊस समाधान कारक झाल्याने रब्बी हंगाम जोमाने आला आहे.गहू , कांदा पीक कमी प्रमाणात घेण्यात आले असून हरभऱ्याचे विक्रमी उत्पन्न होणार आहे.उन्हाचा तीव्र तडाखा , खालावत चाललेली पाणी पातळी यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील लवकरच प्रश्न ऐरणीवर येणार आहे.सध्या विकत चारा घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने कांदा पिकावर देखील रोगराई पसरली आहे.फवारणीसाठी आलेला खर्च जास्त शेतकरी हतबल झाले आहेत.आता पिके काढणीला आली असून मजूर मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर करावा लागणार आहे.हरभरा काढणीसाठी कोणत्याही प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने पारंपरिक पद्धतीनेच काढणी करावी लागणार आहे.तीन ते चार वर्षानंतर हरभऱ्याचे चांगले उत्पन्न होणार असून सरकारने चांगला बाजारभाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पिण्याचे पाणी देखील विकत घेण्याची वेळ आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.