ओसाड पडली माळराने , भीषण पाणी टंचाईने मानवी जीवन विस्कळीत…*
देविदास गोरे , रिपोर्टर..
रुईछत्तिशी – तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने नगर तालुक्यातील ग्रामीण भाग ओसाड पडला आहे.पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.माळरानावर असणारी झाडे उन्मळून पडली आहेत.मार्च – एप्रिल महिन्यात उन्हाळा तीव्र स्वरूपाचा जाणवत असून जूनपर्यंत जनावरांची चाऱ्याची मोठी पंचाईत निर्माण होणार आहे.रब्बी हंगाम पार पडला असून शेतजमिनीत असणाऱ्या कांदा पिकाला पाणी कमी पडू लागली आहेत.गहू , हरभरा , ज्वारी यांची सुगी उरकली असून विहिरींचे नळ उघडे पडले आहेत.गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यापेक्षा भीषण परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे. जनावरे माळरानावर चरण्यासाठी जातात त्यांची पोटाची खळगी माळरानावर भरते पण यंदा माळराने ओसाड पडली आहेत. जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी विकत चारा घेऊन जनावरांना घालत आहेत.पाणी देखील विकत घेण्याची वेळ आली आहे.
गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.मजुरांच्या हाताला काम राहिले नाही त्यामुळे बऱ्याच लोकांवर देखील उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.शेतकऱ्यांची सगळी आर्थिक परिस्थिती शेतीवर अवलंबून असते पण पाण्याअभावी अनेक पिके उन्मळून गेली असल्याने शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडला आहे.पशू – पक्षी यांना देखील पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. काळवीट , हरीण , ससे व इतर रान जनावरे सैरावैरा धावू लागले आहेत.एकंदरीत ओसाड पडलेली माळराने , पाण्याची भीषण टंचाई ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती रेखाटत आहे.