महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क),
दादर(प.), मुंबई – ४०००२८.
७०वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – अहमदनगर – महाराष्ट्र – २०२४.
महाराष्ट्राने दिल्लीवर मात करीत बाद फेरी गाठली. आदित्य शिंदे ठरला महाराष्ट्राचा तारणहार.
अहमदनगर:- महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. सुरवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला. पण महाराष्ट्राने त्याला प्रतिउत्तर देत १४व्या मिनिटाला पहिला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात २३-१२ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करीत आपली आघाडी २६-१३ अशी वाढविली. यानंतर दिल्ली ने आपला आक्रमण आणखी धारदार करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत ही आघाडी २४-२८अशी कमी केली. शेवटी शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी २गुणावर आणली. त्यावेळी महाराष्ट्राचे ३ खेळाडू मैदानात शिल्लक होते. अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करीत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढविल्या. शेवटी सौरभ राऊत ने दिल्लीचे शिलकी ३ गडी टिपत दिल्लीवर लोण दिला आणि पंचानी सामना संपल्याची शिट्टी वाजविली. या विजयाने नगरच्या क्रीडा रसिकांनी सुटकेचा श्वास घेतला. महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे, आकाश शिंदे, संकेत सावंत, हर्ष लाड यांचा या विजयात महत्वाचा खेळ केला. दिल्ली कडून सुरींदर, विनीत माळी, गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.