विखे कुटुंबाने आश्वासने देऊन भुलविण्याचे काम केले !

 विखे कुटुंबाने आश्वासने देऊन भुलविण्याचे काम केले !

आ. नीलेश लंके यांचा आरोप 
शेवगांव तालुक्यात स्वाभिमान 
जनसंवाद सभांना प्रतिसाद
गावागावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत
शेवगांव : प्रतिनिधी 
सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हाच त्यांचा अजेंडा असून गेल्या ५० वर्षांपासून जिल्ह्याचे राज्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांनी या मोठ्या कालखंडात कोणते मोठे काम केले असा सवाल करतानाच,त्यांनी केवळ आश्‍वासने देऊन मतदारांना भुलविण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार नीलेश लंके यांनी विखे यांचे नाव न घेता केला.त्यांनी काही केले नाही,त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही.त्यामुळे इंग्रजी भाषेच्या शिळ्या कढीला उत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्यांच्या अपयशाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे चालले असल्याचे आ. लंके म्हणाले.
     
     आ.लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या चौथ्या दिवशी  प्रताप ढाकणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी शेवगांव तालुक्यातील आमरापूर,आव्हाणे,ढोरजळगांव, शेवगांव तसेच पाथर्डी येथे भेटी दिल्या.त्यावेळी विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये लंके यांनी विखे पितापुत्रांवर जोरदार हल्ला चढवला. विविध गावांमध्ये झालेल्या सभांना नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तरूणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.  
 
     आमदार लंके म्हणाले की,कोरोना संकटात हे कोणत्या बिळात जाऊन बसले होते.त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन विमानातून आणल्याचा देखावा केला. कार्यकर्त्यांची तोंडे पाहून ती देण्यात आली. बरीच इंजेक्शन तर विकली गेली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात आले त्याचाही त्यांनी धंदा केला. शासनाचा निधी लाटण्यात आला.असे  गंभीर आरोप करतानाच,असे उद्योग आम्ही केले नाहीत असे आ. लंके यांनी निक्षून सांगितले.          
     
     लंके म्हणाले, स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्‍नांची पत्रिका तयार करण्यात येऊन नंतर या प्रश्‍नपत्रिकेचे प्रश्‍न सोडवून उत्तरपत्रीकेत त्याचे रूपांतर करायचे आहे. निवडणूक लढवायची असेल तर समोर विशिष्ठ उद्दीष्ट हवे. निवडणुका आल्या की फक्त गप्पा मारायच्या हे विरोधकांचे धोरण आहे. ज्यांना तुम्ही निवडून दिले, खरे तर गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केले हे त्यांनी मतदारांना सांगितले पाहिजे. मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूकीला सामोरे जाण्याऐवजी त्यांनी व्यक्तीद्वेष सुरू केला असल्याचे लंके म्हणाले. 
         शेतकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्‍न त्यांनी संसदेत मांडणे क्रमप्राप्त होते. इंग्रजी पोपटपंची करणारा खासदार हवा की काम करणारा खासदार हवा ? केवळ इंग्रजी बोलून पोट भरणार आहे का ? अर्थात खासदारांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांचे काही देणे घेणे नसल्याचे आ.लंके म्हणाले.
▪️चौकट 
निर्यात बंदी उठली नाही, आता मते मागणार का ?  
मध्यंतरी गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचा देखावा विखे, पिता पुत्रांनी केला. निर्यात बंदी उठविण्यात आल्याची घोषणाही खासदारांनी केली. निर्यात बंदी उठली नसती तर मी मते मागण्यासाठी येणार नव्हतो असेही खासदारांनी सांगत निर्यात बंदीचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी नगरच्या बाजार समितीमध्ये सत्कारही स्वीकारला. प्रत्यक्षात मात्र निर्यातबंदी उठलीच नाही. आता ते शेतकऱ्यांकडे मते मागण्यासाठी जाणार का असा सवाल  लंके यांनी केला.  
▪️चौकट 
तुम्हाला अभिमान वाटेल असे काम मी करेल 
नगर जिल्हयात दडपशाही, फसवणूकीचे राजकारण सुरू आहे. त्याविरोधात लढा देण्यासाठी  आपण लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहोत. मतदारांनी मला संधी दिल्यास माझ्यावर टाकलेल्या विश्‍वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मला स्वार्थासाठी हे पद नको. सामान्यांना न्याय देणारा मी माणूस आहे. तुम्हाला अभिमान वाटेल असे काम मी करून दाखविल अशी ग्वाही लंके यांनी दिली. 
▪️चौकट 
विरोधकांकडून अपप्रचार 
माझ्या विधानसभेच्या नगर-पारनेर मतदारसंघाविषयी  विरोधक अपप्रचार करत आहेत. खरे तर मतदारसंघातील जनता माझ्यावर हृदयापासून प्रेम करते. माझ्यावरील हे प्रेम मतदानपेटीतून दिसेल असा विश्‍वास लंके यांनी व्यक्त केला. 
▪️चौकट 
लंके खासदार होणार आहेत 
जो दबाव सहन करतो तो कायमचा दाबला जातो. जो दबाव झुगारतो ते पुढे जातो. लंके विस्थापित, ते कोणाला घाबरले नाहीत. त्यामुळे ते सरपंचपदापासून आमदार झाले व आता खासदार होणार आहेत. स्व. बबनराव ढाकणे फाटकेच होते. ते दिल्लीपर्यंत पोहचले. आपण विचारांची लढाई लढतोय. प्रस्थापित विस्थापितांना दाबण्याचे काम करतात. आपण इथे पक्ष म्हणून नाही तर विचार म्हणून एकत्र आलो आहोत. वंचित, विस्थापितांचा आवाज उठविणारा माणूस म्हणजे नीलेश लंके. लोकशाहीत दडपशाही चालत नाही. 
प्रताप ढाकणे
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते 
 
▪️चौकट 
निष्क्रीय खासदार 
भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात निष्क्रीय खासदारांच्या यादीत विखे यांचे नाव होते. याउलट आमच्या नगर-पारनेर मतदासंघात सर्वाधिक विकास कामे झाली आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीमधून सर्वाधिक निधी मिळविणारा मी २८८ खासदारांमधील पहिल्या क्रमांकाचा आमदार आहे हे मी नाही तर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे सांगतात असे लंके यांनी यावेळी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *