‘ती’ ऑडिओ क्लिप बनावटच
विखे पाटलांचे पितळ उघडे
क्लीपमध्ये लंके यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केलेले घाडगे शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचे उघड
पारनेर, (प्रतिनिधी) ः विखे पाटील परिवाराकडे निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नसल्यामुळे खोट्या-नाट्या ऑडिओ क्लिप काढून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्याचा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून केला जात आहे. सोशल मिडियावर प्रसारीत होणारी तथाकथित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे त्या निवृत्ती घाडगे यांनी आपण निलेश लंके यांचे कार्यकर्ते नसून शिंदे गटात काम करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विखे पाटील टोळीकडून करण्यात आलेले मानहानीकारक आरोपांचा पर्दाफाश झाला आहे.
सोशल मिडियावर प्रसारीत झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विखे पाटील यांना निलेश लंके समर्थकांने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु क्लिपमध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे ते निवृत्ती घाडगे यांनी हा आपला आवाज नसून आपल्या नावावर खोटे-नाटे पसरविले जात आहे. मी स्वतः शिंदे गटात काम करीत असून आपला निलेश लंके यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आपली बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आपण पोलीसांत तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान या व्हिडिओ क्लीपमुळे काही काळ खळबळ माजली होती. परंतु या क्लिपमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उडालेला धुरळा खाली बसला असून क्लीप व्हायरल करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. अशा प्रकारचे उद्योग करण्यापेक्षा विखे पाटील कुटुंबियांनी आपण जर काही विकासकामे केली असतील तर त्यांच्या नावाने मते मागावी. ही लढाई एक सर्वसामान्य माणूस विरुद्ध सरंजामदार अशी असून या लढतीत सरंजामदार चारी मुंड्या चीत करण्याचा निर्धार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेने केला आहे.