या तालुक्यातून एक लाखांचे लीड घेणार !
आ. नीलेश लंके यांचा आत्मविश्वास
दहा वीस डफड्यावाल्यांकडून मताधिक्क्याविषयी अपप्रचार
पारनेर : प्रतिनिधी
तालुक्याच्या मताधिक्क्याविषयी दहा वीस डफड्यावाले इतर तालुक्यात अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपण तालुक्यातून किमान एक लाखांचे मताधिक्य घेऊ असा आत्मविश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये शुक्रवारी बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला. याच दौऱ्यादरम्यान भाळवणी येथे पार पडलेल्या बैठकीत नीलेश लंके यांनी तालुक्यातील मताधिक्क्याविषयी आपण निश्चिंत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना लंके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी आहे. निवडणूक लोकांनीच हाती घेतली आहे. पारनेर-नगर मतदारसंघात माझ्यावर जनतेने प्रेम करणे हे स्वाभाविक आहे. परंतू बाहेर गेल्यानंतर तेथील जनतेबरोबरच लहान-लहान मुलेही प्रेम करतात. हे पाहून अभिमानाने उर भरून येतो. असे असताना पारनेर विषयी इतर तालुक्यात वेगळे चित्र रंगवून अपप्रचार करण्यात येतो. खासदारकीची निवडणूक लढविण्याआधी आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस मी दाखविले आहे. खासदार तर मी होणारच आहे. परंतू पारनेरला अपेक्षीत मताधिक्य न मिळाल्यास मी खासदारकीचा देखील राजीनामा देईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी चोख बजवावी असे लंके यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब तरटे, बापूसाहेब शिर्के, गंगाराम बेलकर, प्रियंका खिलारी, संभाजी रोहोकले, राजेंद्र चौधरी, अशोक रोहोकले, दिपक पवार, नितीन अडसूळ, सुवर्णा धाडगे, बाळासाहेब पुंडे, बबन भुजबळ, आबासाहेब चेमटे, किरण ठुबे, संजय काळे, अमोल पवार, जयसिंग दावभट यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
▪️चौकट
बुलढाण्याच्या अध्यक्षांची दोन लाखांची तर पारनेरच्या शिवाजी मते यांची १ लाखांची मदत
बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवानंद पवार यांनी लंके यांच्या निवडणूकीसाठी दोन लाखांची मदत दिली.तर पारनेर येथील कार्यक्रमात उद्योजक शिवाजी मते यांनी १ लाख रुपयांची मदत आ.लंके यांच्याकडे सूपूर्द केली.पवार गेल्या आठ दिवसांपासून मतदारसंघात असून ते गावोगावी जाऊन लंके यांच्यासाठी मतदारांमध्ये जागृती करीत आहेत. एकदाच भेट झाली आणि या व्यक्तीशी आमचा स्नेह जुळला. आम्ही बुलढाण्याहून त्यांच्यासाठी इथे आलो. तुम्ही तुमच्या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी ऐंशी टक्क्यांहून अधिक मतदान लंके यांना करण्याचे आवाहन पवार यांनी केले. दरम्यान, शेगावच्या गजानन महाराजांचा प्रसाद तसेच शाल देऊन पवार यांनी लंके यांचा सन्मान केला.
▪️चौकट
तालुक्याची अस्मिता, हक्क जागृत ठेवा
पारनेर तालुका हा सेनापती बापट, अण्णा हजारे यांच्या विचारांचा तालुका आहे. २५ वर्षापूर्वी स्व. गुलाबराव शेळके यांच्या माध्यमातून पारनेरकरांना खासदारकीची संधी निर्माण झाली होती. दुर्देवाने ती संधी मिळाली नाही. तालुक्याला २५ वर्षानंतर ही संधी आली आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदारांनी तालुक्याची अस्मिता व हक्कासाठी जागृत होणे आवश्यक असल्याचे लंके म्हणाले.
▪️चौकट
समोरचे उमेदवार आजोबा, पंजोबांचीच आश्वासने देत आहेत !
समोरचे उमेदवार त्यांच्या आजोबा पंजोबांनी दिलेली अश्वासने पुन्हा देत आहेत. त्यांच्या माध्यामातून गेल्या ५० वर्षात कोणताही प्रश्न सुटलेला नाही. तरीही चार सहा डफडेवाले तालुका डिस्टर्ब करीत आहेत, ज्यांच्या अंगावर आयुष्यात कधीही गुलाल पडला नाही डॉ. विखे समर्थकांना असा टोला लगावत पारनेरकरांसाठी हा लढा स्वाभिमानाचा आहे. आपल्या विजयाने पारनेरकरांची कॉलर टाईट होणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
आपल्या लढतीकडे देशाचे लक्ष
या लढतीवर केवळ राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागलेले आहे. नीलेश लंके खासदार झाल्यानंतर एका धनाढय शक्तीला पराभूत करून आलेला लंके कोण ? याची चर्चा दिल्लीतही होणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
ते फक्त याच निवडणूकीला मते मागणार आहेत
लोकसभेच्या पुढील पंचवार्षिक निवडणूकीत शिर्डी मतदारसंघ खुला होणार आहे. त्यामुळे समोरचा विरोधक एवढयाच वेळी आपल्याकडे मते मागणार आहे. म्हणून तालुक्यातील मतदारांनी जागरूक होणे गरजेचे आहे. आपला विजय अटळ असल्याची पुस्तीही लंके यांनी जोडली.
▪️चौकट
विखेंचे गुपीत लंके यांना सांगणार !
विखे परिवाराचा मी भाळवणीतील सर्वात जुना कार्यकर्ता होतो. राधाकृष्ण विखे यांना मी स्वतः कधीही फोन करू शकलो नाही. त्यांचा फोन पीएकडे असतो. त्यांच्या पीएलाही पीए आहेत. त्यांच्या निवडणूकीच्या कार्यपध्दतीची मला जवळून माहीती आहे. त्यांची सर्व यंत्रणा पेड यंत्रणा आहे. ते पैशांचे वाटप कसे करतात. याची मला माहीती आहे. ही सर्व माहीती खाजगीत लंके यांना सांगणार आहे. ४० वर्षे मी विखे यांच्या जवळ होतो. परंतू हे कृतघ्न कुटूंब आहे.
संभाजी रोहोकले सर
अध्यक्ष, पारनेर तालुका काँग्रेस कमिटी