विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील
नगर प्रतिनिधी
भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीच्या वेळी माध्यमांशी बोलत होते.
मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहिल्यानगरीत येणार आहेत. त्यामुळे सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने सर्वच वातावरण ढवळून निघणार असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असून आतापर्यंतच्या प्रचारत लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.अनेक छोट्या मोठ्या सामाजिक, राजकीय, सेवाभावी, धार्मिक त्याच बरोबर क्रिडा संघटनांनी समर्थन दिले. त्याच बरोबर महायुतीच्या सर्व घटक प्रक्षातील पदाधिकारी आणि कार्यक्रर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत नवी उर्जा दिली. यामुळे विजय केवळ आमचाच आहे. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
खा. सुजय विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वाचे नेते आहेत. त्यांची लोकप्रियता ही जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. यामुळे नगरकर सुद्धा त्यांच्या सभेची आतूरतेने वाट पाहत आहेत. विरोधकांनी ज्या भूलधापा देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हा डाव पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे हाणून पाडला जाईल. आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात असलेली नगरची जनता व नगरचे वातावरण मोदीमय होऊन जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंगळवारी होणारी सभा ही नगरच्या विकासाची पायाभरणी करणारी सभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नगरच्या जनतेकडे लक्ष ठेवले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. यामुळे येणाऱ्या ४ जून रोजी पुन्हा देशात मोदींचे सरकार येणार असल्याने आणि नगरमध्ये महायुतीचा खासदार असल्याने नगरच्या विकासाचा रथ अधीक गतीमान होणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, दळणवळणाची साधने, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्रातील सुविधा,महिलांच्या सबलिकरणाच्या योजना अशी विविध कामे आता जलद आणि सुलभ होणार असे खा. विखे म्हणाले.