कोरोना संकटात नीलेश लंके यांची ऐतिहासिक कामगिरी !
शरद पवार यांचे गौरवोदगार
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर येथे जाहिर सभा
नगर : प्रतिनिधी
ज्यावेळी कोरोनाचे संकट देशावर होते त्यावेळी अनेक लोक परदेशात गेले, घराच्या बाहेर पडले नाहीत. परंतू पारनेरसारख्या दुष्काळी भागात एक स्वतंत्र यंत्रणा उभी करून कोरोना बाधितांना अखंडपणे सुविधा उपलब्ध करून देत त्यांची सेवा करण्याचे ऐतिहासिक काम कोणी केले असेल तर ते नीलेश लंके यांनी केले असल्याचे सांगत गरीबांचे सेवा करणाऱ्या उमेदवाराला मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, उत्तम जाणकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्यासह जिल्हयातील अनेक मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, निवडणूकीत परिवर्तन करण्यासाठी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार नीलेश लंके यांच्या रूपाने निवडला असून त्यांना विजयी करण्याची तुमची माझी जबाबदारी आहे. मोदींच्या राज्यात लोकशाही आहे का किंवा कितपत राहणार आहे याची चिंता वाटण्याजोगी परिस्थिती आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जनतेने तीनदा निवडून दिले, लोक त्यांच्या पाठीशी आहेत. ते तुरूंगात आहेत. झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री मोदींच्या धोरणाला विरोध करतात म्हणून तुरूंगात आहेत. संजय राऊत, अनिल देशमुख यांनाही तुरूंगात डांबण्यात आले. सत्ता ही जनतेच्या हितासाठी वापरायची असते मात्र विरोधात बोलला की तुरूंगात डांबत सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचे पवार म्हणाले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झालीय काय ? निवडणूका घेतल्या नाही, त्यानंतर लोक गप्प बसले व त्यानंतरच्या काळात घटना बदलून आपल्या सोईचा कारभार करण्याचे धोरण असेल तर आपल्याला विचार करावा लागेल असेही पवार म्हणाले.
▪️चौकट
शांतीच्या मार्गात मोदींचा अडथळा
मोदींनी नगरमध्ये मुस्लिम समाजाविषयी वक्तव्य केले. या देशात सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याची आवष्यकता आहे. तरच आपला देश प्रगतीच्या रस्त्यावर जाईल. शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला. याच शहरातील आचार्य आनंदॠषीजी यांनीही शांतीचा दिला. या रस्त्याने जाताना आपला सर्वात मोठा अडथळा नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे.
शरद पवार
▪️चौकट
राज्यातील गुंंडगिरीला फडणवीस कारणीभूत
या शहरात दहशहतवाद, गुंडगिरी, ताबेमारी सुरू आहे त्यांच्याबाबतीत पोलीसांचा दंडूका दिसला नाही. सुजय विखे यांच्या मिरवणूकीत खुनाच्या गुन्हयातील आरोपींचे छायाचित्रे झळकली, त्यांना कायद्याची भिती नाही. दुसरीकडे आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जातेय. देशात महाराष्ट्रात जी गुंडगिरी सुरू आहे त्यास कारणीभुत देवेंद्र फडणवीस आहेत.
▪️चौकट
तुरूंगातली दोस्ती पक्की !
या सभेसाठी अनिल देशमुख उपस्थित आहेत. ते नागपूरचे टायगर आहेत तर मी मुंबईचा टायगर आहे. त्यांची आणि माझी दोस्ती आहे. तुरूंगातली दोस्ती पक्की असते. ती कधी तुटत नाही. तुरूंगातील अडीअडचणी, संकट, संघर्ष याला एकमेकांची साथ असते. असे दोन टायगर एकत्र आहेत.
▪️चौकट
कॉमन मॅन इज सुपर मॅन
नीलेश लंके यांच्यासारखा फाटका, फकीर उमेदवार. तुमच्या आमच्यातला सच्चा माणूस. शिवाय ओरीजनल शिवसैनिक आहे. आजूनही शिवबंधन तोडलेले नाही त्यांनी. शिवबंधन मनगटावर आणि मनातही आहे. त्यांची पत्नी, आई, वडील खाली बसले आहेत कारण हा उमेदवार मुळचा शिवसैनिक आहे. तुतारी आपलीच आहे. तुतारी ते वाजवतील एका हातात मशाल घेउन शिवाय पंजाही सोबत आहे. नीलेश लंके संसदेत जाणार कारण कॉमन मॅन इज सुपर मॅन. लंके हे सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहे.
संजय राऊत
शिवसेना नेते
▪️चौकट
लंके यांच्या कौतुकाचा त्रास होऊ लागला
कोरोना काळात केलेल्या कामामुळे नीलेश लंके यांचे जगभर कौतुक झाले. राज्यातले सरकार बदलल्यानंतर जिल्हयातले महसूलमंत्री झाले आणि लंके यांच्या कौतुकाचा त्रास होऊ लागला. लंके यांना आणि जिल्हयालाही त्रास झाला. खोटया केसेस करणे, कामे बंद करणे, त्रास देणे, परवानगीशिवाय भुमीपुजन करण्यास मज्जाव करणे असा त्रास प्रत्येक तालुक्यात झाला. विधानसभा निवडणूकीत हे सगळे आपण बोलणारच आहोत. या पेटलेल्या भटटीतून, त्या अग्निदिव्यातून काय बाहेर आले असेल त्यातून नीलेश लंके यांच्यासारखा कार्यकर्ता तावून सुलाखून बाहेर आला आहे. लंके लोकप्रिय होतोय हे थांबविण्यासाठी आणखी त्रास सुरू झाला तीतकी ही तलवार धारदार होत गेली.
बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते
▪️चौकट
जिल्हयाचा आजार दुर करणार !
चाळीसपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत. नीलेश लंके लाखोंच्या मताधिक्क्याने विजयी होणार आहेत. परंतू इथपर्यंत थांबून उपयोग नाही. दुखणं बरं करायचे असेल तर ऑपरेशन पुर्णच करावे लागेल. यानंतर विधानसभेसाठी शिर्डी मतदारसंघासाठी आमचा उमेदवार तयार आहे. जिल्हयातील सगळयांना सांगतो की जिल्हा शांततेत, व्यवस्थित चालवायचा असेल, बंधुभावाच्या वातावरणात, लोकशाही मार्गाने चालवायचा असेल तुम्हाला ही कीड काढण्यासाठी सर्वांना एकत्र रहावे लागेल. पक्ष कोणताही असो असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
▪️चौकट
माजी सैनिकाची मदत
माजी सैनिक बबनराव गाडीलकर यांनी त्यांच्या निवृत्तीवेतनातून १ लाख ११ हजार रूपये तर संतोष लंके यांच्यावतीने ५१ हजार रूपयांची मदत या सभेत आ. नीलेश लंके यांच्या निवडणूक निधीसाठी दिली.
▪️चौकट
नीलेश भाऊ ३ लाखांनी विजयी होणार !
नगर व श्रीगोंद्याची सभा पाहिली तर मला विश्वास आहे की नीलेश भाऊ तीन लाखांच्या मताधिक्क्याने खासदार होणार आहेत. येत्या तीन जुनला नीलेश लंके हे विजयी झालेले असतील आणि त्या दिवशी सर्वांना गुलाल खेळायचा आहे. महाविकास आघाडीचे किमान ३५ उमेदवार विजयी होणार आहेत, राज्यामध्येही महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच इथल्या खासदारांना मला सांगायचे आहे की तुम्ही आता माजी खासदार झालेला आहात, चार जुनला तुम्ही व मोदी निवृत्त होणार आहात. त्याबाबत काळजी करू नका. कारण ही निवडणूक सामान्य जनतेने हाती घेतली असल्याचे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.
▪️चौकट
उत्तरेचं कॅलेंडर दक्षिणेत !
विखे पाटलाचं पोरगं इथं आणून ठेवलंय रेडीमेड ! उत्तरचं कॅलेंडर जर दक्षिणेत आणलं.२०२९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे तुम्ही विखे यांना निवडून दिलं तर ते उत्तरेचा विकास करतील. कारण त्यांना पुढची निवडणूक तिकडून लढवयाची आहे. तिकडे राखीव आहे म्हणून त्यांनी इकडे उडी मारली असल्याचे नितेश कराळे म्हणाले.