नवनागपूर गटात सोनूताई विजय शेवाळे यांचा जनसंपर्क दौरा सुरू; मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
नवनागपूर (प्रतिनिधी) — जिल्हा परिषद नवनागपूर गटातील भाजपच्या संभाव्य उमेदवार सोनूताई विजय शेवाळे यांनी गटातील गावोगावी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनसंपर्क दौऱ्यास सुरुवात केली असून, त्यांच्या या दौऱ्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात नागरिक, महिला, युवक व शेतकरी वर्गाशी थेट संवाद साधत शेवाळे या विकासाचा अजेंडा मांडत आहेत.
वडगाव गुप्ता येथे त्यांनी यापूर्वी केलेल्या विविध विकासकामांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात ठामपणे रुजलेला असून, त्या कामांच्या पाठबळावरच नवनागपूर गटातही सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शालेय विकास, महिला व युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम यांवर भर देण्याचे आश्वासन त्यांनी या भेटीदरम्यान दिले.
“वडगाव गुप्ता येथे जनतेच्या विश्वासातून विकासकामे मार्गी लावली. तोच विश्वास आणि अनुभव घेऊन नवनागपूर गटातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” असे सोनूताई विजय शेवाळे यांनी सांगितले. त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे व कामाचा अनुभव पाहता नागरिक मोठ्या संख्येने पाठिंबा देत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या दौऱ्यादरम्यान अनेक गावांतील नागरिकांनी आपापल्या समस्या, मागण्या व अपेक्षा मांडल्या असून, त्या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन टप्प्याटप्प्याने सोडवणूक केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विशेषतः महिलांचा वाढता सहभाग आणि युवकांचा सकारात्मक प्रतिसाद हे त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरत आहे.
नवनागपूर गटात विकासाची नवी दिशा देण्याच्या निर्धाराने सुरू झालेल्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनूताई विजय शेवाळे यांचे आव्हान अधिक भक्कम होत असल्याचे बोलले जात आहे.


