हिवरेबाजारमध्ये सेंद्रिय कर्बाची प्रयोगशाळा राष्ट्रीय धोरणासाठी  दिशादर्शक ठरणार !

हिवरेबाजारमध्ये सेंद्रिय कर्बाची प्रयोगशाळा राष्ट्रीय धोरणासाठी  दिशादर्शक ठरणार !

सहसचिव भारत सरकार नितीन खाडे यांचे प्रतिपादन

हिवरेबाजार : प्रतिनिधी

         हिवरेबाजार येथे सुरू करण्यात आलेली देशातील पहिली मातीतील सेंद्रिय कर्ब व पाण्याद्वारे वाहून जाणाऱ्या कर्ब मापनाची प्रयोगशाळा ही देशाच्या भविष्यातील पर्यावरण धोरणासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या पाणलोट व्यवस्थापन व भू-संपदा विभागाचे सहसचिव नितीन खाडे भारत सरकार यांनी केले.

         वृक्षारोपण मासानिमित्त आयोजित कार्यक्रमात मातृस्मृती वनमंदिर परिसरात ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून एकूण १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ खाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.

         यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “हिवरेबाजार हे गाव आज जागतिक स्तरावर मृद व जलसंवर्धनाच्या आदर्श मॉडेलप्रमाणे ओळखले जाते. १९९३ मध्ये सी.एच. हनुमंतराव यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारणासाठी ठरविण्यात आलेल्या धोरणातही हिवरेबाजारच्या कामाचा समावेश करण्यात आला होता.” तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या नियोजनासाठी दिल्ली येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अनुभवाचा लाभ घेतला गेला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

           पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हिवरेबाजारने केवळ पाण्याचे व्यवस्थापन केले नाही, तर मूल्याधारित विकास , स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आणि दर्जेदार शिक्षण या बाबतीतही मोठे कार्य घडवून आणले आहे.”

          कार्यक्रमात सौ. खाडे, वसंत बिनवडे उपसंचालक आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती,सरपंच विमलताई ठाणगे, उत्तम ठाणगे, बबन पाटील, सीताराम भालेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन खाडे यांचा हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून विशेष सन्मान करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धन, जैविक शेती आणि मृदसंधारण या क्षेत्रातील संशोधन व प्रयोगशीलतेला नवी दिशा मिळणार असून, हिवरेबाजारचा अनुभव देशासाठी आदर्श ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *