डॉ.अनिल बोरगेंच्या अतिक्रमणामुळे शेतकरी उध्वस्त
सोनेवाडी ग्रामस्थांचा आरोप; अतिक्रमण हटवण्याबाबत निवेदन
अहिल्यानगर : डॉ.अनिल अशोक बोरगे यांनी सोनेवाडी (ता.अहिल्यानगर) येथील मोढवा वस्ती येथे दवाखाना बांधला. परंतु या दवाखान्याची भिंत ही येथून वाहणाऱ्या नदीच्या पुलावर अतिक्रमण करत बांधली. त्यामुळे या भिंतीमुळे पावसाचे नदीत वाहून जाणारे पाणी नदीत न जाता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप सोनेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. हे अतिक्रम काढावे याबाबत त्यांनी सोनेवाडी ग्रामपंचायतीस निवेदन दिले असून १५ दिवसांत अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनेवाडी येथील मोढवा वस्ती येथील वाहणाऱ्या नदीवर डॉ. अनिल अशोक बोरगे यांनी या नदीवरील पुलावर अतिक्रमण करत भिंत उभारली आहे. या भिंतीमुळे पावसाने येणार पाणी नदी मध्ये जात नाही. हे पाणी आमच्या शेतात येते. दि.27 मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहणारे पाणी या भिंतीमुळे अटकाव होऊन नदीत न जाता आमच्या शेतात आले. त्यामुळे शेतातील हजारो रुपयांचा कांदा, गोठा आदींचे नुकसान झाले आहे. जमिनी देखील खोंगळल्या आहेत. ही अतिक्रमित केलेली भिंत काढून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा, पुढील पंधरा दिवसात अतिक्रमण न काढल्यास तिव्र आदोलन करण्यात येईल, याची जबाबदारी ग्रामपंचायतची असेल असा इसाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर अतुल विलास वारे, बाबासाहेब खंडू वारे, गोरख विलास वारे, प्रतीक रघुनाथ शेळके, सागर विलास शेळके आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
चौकट
विधानसभेत आवाज उठवणार : आ. दाते
दि.२७ मे रोजी पावसाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आ. काशिनाथ दाते हे अकोळनेरकडे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांना थांबवलं. त्यांनी झालेले नुकसान त्यांना दाखवले. त्यावर आ. दाते यांनी योग्य ती चौकशी करत दोषी आढळल्यास विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासित केले.
चौकट
एक तारखेपर्यंत अतिक्रमण हटवा : पालकमंत्री विखे पाटील
वाळकी, अकोळनेर आदी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी सोनेवाडी भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी डॉ. बोरगे यांच्या अतिक्रमणाचा व नुकसानीचा विषय त्यांच्याही समोर मांडत व्यथा मांडल्या. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वतः पाहणी करत सदर अतिक्रमण येत्या १ जून तारखेपर्यंत काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करण्याचेही निर्देष देण्यात आले आहेत.


