अहमदनगा
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी मात्र कोणावरही टीका न करता केवळ विकासाच्या मुद्दयावर प्रचार करत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. कार्ले यांच्या नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्ले यांनी गुरुवारी नगर तालुक्यातील अकोळनेर, चास, कामरगाव, सोराळा कासार, घोसपूरी यांसह नगर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत कार्ले यांचे स्वागत केले. चार नोव्हेंबरपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदार होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी असल्याने प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून काशिनाथ दाते महाविकास आघाडीकडून राणी लंके उमेदवार आहेत. तर माजी आमदार विजय औटी, माजी नगराध्यक्ष विजय औटी, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले हे तीन मातब्बर अपक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. संदेश कार्ले एकमेव उमेदवार नगर तालुक्यातील असल्याने नगर तालुक्यातील गावांमध्ये कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त असतांना अपक्ष उमेदवार कार्ले मात्र विकासाचा अजेंडा घेऊन प्रचार करत आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. पारनेर येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा कसा उतरविणार, युवकांच्या हाताला काम कसे देणार यावर ते बोलत आहे. तसेच विजयी झाल्यानंतर आपण काय करणार याचा वचननामा कार्ले यांनी प्रसिद्ध केला आहे. दरम्यान नगर तालुक्यातील नागरिकांनी कार्ले यांना गावात मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
पारनेर-नगर मतदारसंघात
सांगली पॅटर्नची तूफान चर्चा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवारी केली होती. तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला गेला होता. मतदारसंघात काँग्रेसचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे तेथे काँग्रेसचे निष्ठावंत विशाल पाटील हे विजयी झाले. येथे काँग्रेसनेही पाटलांना मदत केल्याचे बोलले जातेय. तशाच पद्धतीने पारनेर-नगर मतदारसंघात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. येथे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी हे तीन टर्म आमदार होते. तसेच या मतदारसंघात नगर तालुक्यातील 42 गावे जोडली गेली आहेत. त्या गावांमध्येही शिवसेनेच अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. अपक्ष उमदेवार संदेश कार्ले हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आहेत. गेल्या 20 वर्षापासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, पंचायत समितीचे सभापती पद, जिल्हा परिषदमध्ये त्यांनी दहा वर्ष प्रतिनिधीत्व केले आहे. नगर तालुक्यात शिवसेना वाढीचे काम त्यांनी केले आहे. मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मानणारा असल्यामुळे आणि कार्ले निष्ठावंत शिवसैनिक असल्याने मतदार त्यांना कितपत स्विकारतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.