सर्वसामान्य गृहिणीलाउमेदवारी ही लोकशाहीची ताकद
सक्षणा सलगर यांचे प्रतिपादन
लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत करा
पारनेर : प्रतिनिधी
एक सर्वसामान्य गृहिणी विधानसभेची उमेदवार असू शकते,साडे तीन लाख लोकांचे ती विधानसभेत प्रतिनिधित्व करू शकते हे संविधानाचे, भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या शिक्षणावर,बोलण्यावर टीका करणाऱ्यांना संविधान, लोकशाही समजलीच नाही असा टोला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगार यांनी लगावला.आम्हाला प्रवरेची धुणी धुणारे लोकप्रतिनिधी नकोत तर सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे, त्यांच्या हितासाठी झटणारे लोकप्रतिनिधी हवेत.खा.नीलेश लंके यांना तुम्ही लोकसभेत पाठवले,त्याचीच पुनरावृत्ती करीत तुम्हाला आता राणी लंके यांना विधानसभेत पाठवायचे असल्याचे सलगार म्हणाल्या.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारासाठी पोखरी येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.खा.नीलेश लंके माधवराव लामखडे, गंगाराम बेलकर,विकास रोहोकले, मारूतीराव रेपाळे, सुवर्णा धाडगे, राजू चौधरी, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे शिक्षण चौथी होते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा गाडा यशस्वीपणे हाकला. एक घरामध्ये स्वयंपाक करणारी महिला विधानसभेची उमेदवार आहे की लोकशाहीची खरी ताकद आहे. शेताच्या बांधावर बसलेल्या एखाद्या फाटक्या शेतकऱ्याला जे ज्ञान असते ते पदव्युत्तर शिक्षण घेणारालाही नसते. मी ज्या मतदारसंघात फिरते, त्या भागातील भाषेत, त्या स्टाईलमध्ये बोलावं लागतं. ज्याला प्रेमाची भाषा त्याला प्रेमाची भाषा. ज्याला कळत नाही त्याला हाबाडा देण्याची स्टाईल आमच्याकडे आहे, असे सांगत सलगर यांनी विरोधकांना सुनावले.
विरोधक एकाच घरात दोन पदांबाबत बोलतात.आमचे काम बोलते. आम्ही २४ तास काम करतो. कामाला महत्व आहे. तुम्ही काम करा. आज भूछत्रासारखे उगवले आणि आमच्यावर आरोप करत आहेत, अश्या शब्दात खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांना फटकारले.