भाजपाचे टेंडर भरणारे कसले निष्ठावान शिवसैनिक
खा. नीलेश लंके यांचा संदेश कार्ले यांच्यावर हल्लाबोल
नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
निमगांव वाघा : विशेष प्रतिनिधी
निष्ठावान शिवसैनिक उपद्याप करत नाहीत. तुम्ही शिवसेनेचे निष्ठावान म्हणता दुसरीकडे भाजपाचे टेंडर भरता मग तुम्ही कसले निष्ठावान शिवसैनिक ? उध्दव ठाकरे यांना अपमानास्पद पध्दतीने वर्षा बंगल्याबाहेर काढले त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही बंडखोरी करता असे सांगत खा. नीलेश लंके यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संदेश कार्ले यांचे नाव न घेत हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना खा. लंके पुढे म्हणाले, शिवसेनेची व्याख्या मला सांगू नका. माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. स्वाभिमानी मतदार बंडखोरी खपवून घेणार नाही. हे ठरावीक गावांत फिरतात. लोक बुक्क्याच्या गाडीत नव्हे तर गुलालाच्या गाडीत बसतात. आमच्या व्यासपीठावर निष्ठावान लोक असल्याचे लंके यांनी सांगितले.
लंके पुढे म्हणाले, ही निवडणूक राज्याच्या हिताची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. आपला उमेदवार विजयी होणारच आहे. फक्त मताधिक्क्याचा प्रश्न शिल्लक असल्याचे सांगत ही निवडणूक फार पुढे निघून गेल्याचे लंके म्हणाले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.शशिकांत गाडे हे होते.यावेळी माधवराव लामखडे, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, घनश्याम म्हस्के, बाळासाहेब कोतकर, संजय जपकर, आबासाहेब कर्डिले, शिवा होळकर, पोपट खामकर, एकनाथ झावरे, साहेबराव बोडखे, अजय लामखडे, विद्या भोर, बाळासाहेब गायकवाड, केतन लामखडे, गंगाधर रोहकले, वसंत पवार, अशोक शिंदे, मंजाबापू निमसे,व्ही.डी. काळे, अशोक धनवटे, शंकर साठे, छबु महांडुळे, तुकाराम कातोरे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब पानसंबळ, पप्पू कोल्हे, संजय पाटील, विकास रोहोकले, गौरव नरवडे, विलास होळकर, वसंत ठोकळ, सुरेश ढवळे, अंकुश काळे, राजकुमार आघाव, प्रदीप धुंगार्ड, दिलीप नाट, प्रशांत साठे, भास्कर भोर, बबन भोर, संदिप खेसे, भानुदास लाळगे, धोंडीभाऊ रुपनर, कचरू कांडेकर, सुभाष परभणे, भानुदास भगत, राजू नरवडे, पप्पू ऊरमुडे, राधाकृष्ण वाळुंज, गजानन पुंड, गोरख काळे, भाऊ सोनवणे,दिपक कार्ले, राजेंद्र गावखरे, विलास जपकर, जनार्धन माने, अरुण लांडगे, महेश काळे,, गोकुळ जाधव, पोपट पुंड, नंदा शेंडगे, डॉ.बबनराव डोंगरे, प्रविण कोठुळे आदी. उपस्थित होते.
▪️चौकट
बुडत्या जहाजात बसायला कोणी तयार नाही
२४ तास ३६५ दिवस आम्ही झटतो आहोत, म्हणून जनता आमच्या सोबत आहे, प्रेम करते. आज निवडणूका आल्या म्हणून भुछत्रासारखे ते उगवले आहेत. महायुतीच्या उमेदवारासोबत अनेक जण आपल्यासोबत येण्यासाठी फोन करत आहेत. काहींनी विरोधी उमेदवाराला घोडयावर बसविले. उमेदवारी मिळवून दिली, तेच आता इकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. कारण बुडत्या जहाजात बसण्यासाठी कोणी तयार नसल्याचे लंके म्हणाले.
▪️चौकट
प्रवरेचे टेंडर !
म्हशीच्या शिंगात डोकं घालण्यासाठी पैसा मिळत असेल तर डोके घालायला अडचण काय ? हे प्रवरेचे टेंडर आहे. तुम्ही काय शिवसेनेच्या निष्ठा सांगता ? स्वतःला स्थानिक म्हणता मग आम्ही पाकीस्तानी आहोत का ? चार गावांचे तुम्ही टेंडर घेतले काय ? तुमचे नगर तालुक्यात बुथ लागणार नाही. मी डोक्यात घेतले तर ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नसल्याचे इशारा खा. लंके म्हणाले.
▪️चौकट
चांगल्या विचारांच्या लोकांना बरोबर घ्यायचे आहे
हा मतदार संघ राज्यात चांगल्या विचारांच्या दिशेने न्यायचा आहे. आता मी देखील महाविकास आघाडीमध्ये आहे. भविष्यात चांगल्यास विचारांच्या लोकांना बरोबर घेऊन विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडवायचे असल्याचे लंके म्हणाले.
▪️चौकट
मी बोललो तर झाक उतरेल
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फोन केल्यावर सांगता फार अवघड आहे असे ते सांगत होते. मी त्यांच्याविषयी सविस्तर बोललो तर तुमची झाक उतरेल. नगर शेजारच्या मतदार संघांसाठी हे टेंडर आहे. राहुरी, पारनेर, श्रीगोदे मतदार संघातील शिवसैनिकांना भडकविले जात आहे. जो सोबत त्याला घेऊन जो नाही त्याला सोडून निवडणूक लढविण्याची माझी तयारी असते असे सांगत लंके यांनी संदेश कार्ले यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
▪️चौकट
त्यांच्या पक्षाचे सर्वेक्षणात सांगितलंय कोण विजयी होणार !
स्थानिक मुद्दा काय काढता ? राणी लंके कुठली आहे याची कुंडली तपासा. राणी या तुमच्याच तालुक्यातील आहेत. आपला विजय अटळ आहे, तो कोणीही रोखू शकत नाही. किमान एक लाखांनी उमेदवार विजयी झाला पाहिजे असे काम करा. राज्यात पहिल्या पाच विजयी उमेदवारांमध्ये आपला उमेदवार विजयी होणार असून जे आपल्या विरोधात उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षाचे हे सर्वेक्षण आहे. सल्ल्यात कुस्ती आहे ही त्यामुळे जास्त अंगावर घेऊ नका. समोरचे उमेदवार दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूर करणारे हे आहेत. सर्वजण वेगवेगळया हेतूने उभे आहेत. त्यांना समाजाचे देणे घेणे नसल्याचे सांगतानाच लंके यांनी विरोधकांवर शरसंधान केले.
▪️चौकट
ताकदीने निवडणूक लढविणार
आपण मोठया मताधिक्क्याने विजय होणार असलो तरी आपल्याला ही निवडणूक पुर्ण ताकदीने लढवावी लागेल. कारण पुढच्या निवडणूकीला त्याचा फायदा होणार आहे. लोकसभेला काहींची चुक झाली, आज त्यांनी चुक मान्य करून ते विधानसभेच्या निवडणूकीत सक्रीय झाले आहेत. लोकसभेला कार्यकर्ते गाफील राहील्याने नगर तालुक्यात मताधिक्य कमी झाले या निवडणूकीत मात्र तसे होणार नसल्याचे खा. लंके म्हणाले.
जिल्हाप्रुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, आपल्या सरकारने सर्व शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी केली. विविध विकास कामे केली. देशात राज्याची वैचारिक दृष्ट्या वेगळी होती. परंतु देवेंद्र फडणवीसने राज्यात गावपातळीवर राजकारण करतात तसे राजकारणात राज्यात केले. महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम फडणवीस यांनी केले. सर्वात मोठी लोकशाही देशात आहे. परंतु, या लोकशाहीचे रुपांतर हुकुमशाहीमध्ये करायचे स्वप्न होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचे खासदार विजयी झाले आणि भाजपाचे स्वप्न भंगले. लोकशाही बळकट झाली पाहिजे यादृष्टीने नागरिकांनी मतदान केले. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही वातावरण आहे. अनेक सर्वेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असे सांगितले आहे. विरोधकांना 117 पर्यंतच जागा मिळतील. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. येणारे सरकार हे शेतकरी हिताचे येणार आहे. कापूस, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकर्यांच्या हिताचे असेल. सध्याच्या सरकारच्या काळात कापसाला, सोयाबीनला भाव मिळत नाही. दूध उत्पादकांना अनुदान मिळालेले नाही. जिल्ह्यात विकास आघाडीचे वातावरण चांगले.
लंकेंच्या विजयाची चर्चा देशभरात – प्रा. गाडे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. निलेश लंके यांनी बलाढ्य सजल्या जाणार्या विखे पाटलांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे लंकेंच्या विजयाची चर्चा फक्त महाष्ट्रातच नाही तर देशभरात झाली. येथील निवडणूक देशभरात चर्चेची ठरली असल्याचे जिल्हाप्रुख गाडे यांनी सांगितले. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे ते म्हणाले.
▪️चौकट
३३ सरपंचांची उपस्थिती
४२ पैकी ३३ गावांचे सरपंच मेळाव्यास उपस्थित आहेत. मते वाया घालू नको असे आम्ही आमच्या सहकाऱ्याला सांगितले मात्र त्यांनी ऐकले नाही. मला आलेले अनुभव मी त्यांना सांगितले मात्र त्यात यश आले नाही. १२ पैकी ४ उमेदवार पाठींबा देण्यासाठी तयार आहेत. मात्र तो पाठींबा घ्यायचा की नाही हे सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवावे. नगर तालुक्यात साठ टक्के मते राणी लंके यांना मिळणार असून उर्वरीत ४० टक्के मते इतर उमेदवारांना मिळतील. मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
माधवराव लामखडे
मा. जि. प. सदस्य
▪️चौकट
बहिण, मुलीला काहीतरी जास्त दिले पाहिजे
राणी लंके ही नगर तालुक्यातील मुलगी, बहिण आहे तिला काहीतरी जास्त दिले पाहिजे. नगर तालुक्यात सन २००७ पासून महाविकास आघाडी असून आम्ही एकत्रीत काम करतो आहोत. आज काही लोकांची महत्वाकांक्षा वाढली आहे. माधवराव, मी देखील निवडणूक लढविण्याचा अनुभव घेतला. म्हशीच्या शिंगात डोके घालू नको असे आम्ही आमच्या सहकाऱ्याला सांगितले होते मात्र त्याने ऐकले नाही. विरोधकांनी हिंदू धर्माची वाटणी केली असून ते थांबविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले पाहिजे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. वैचारीक वाटोळे इतके झाले आहे की कोणाला कोणाची भिती राहिली नाही. पैशावर सत्ता हाती घेता येते असा विरोकांचा भ्रम होता मात्र लोकसभा निवडणूकीत खा. नीलेश लंके यांनी तो भ्रम दुर केला.
प्रताप पाटील शेळके
मा. सभापती, जिल्हा परिषद
▪️चौकट
२५ ते ३० हजारांचे मताधिक्य देणार
मतदारसंघात राणी लंके यांनी आघाडी घेतली असून प्रचाराची एक फेरी पुर्ण झाली आहे. त्या मोठया मताधिक्क्याने विजयी होतील. नगर तालुका लंके यांना २५ ते ३० हजारांचे मताधिक्य देईल. शेतकऱ्यांचे प्रश्न महाविकास आघाडी सोडवू शकते.
डॉ. बबनराव डोंगरे
▪️चौकट
काही जण टेंडरसाठी निवडणूकीत !
काही लोक निवडणूकीसाठी तर काही टेंडरसाठी उभे राहतात. लोकसभा निवडणूकीत राजकारणातील मोठया माणसाला धुळ चारण्याचे काम नीलेश लंके यांनी केले. विरोधकांना सुजय विखे विजयी होणार याची खात्री होती तर सर्वेक्षणात मात्र नीलेश लंके हे नेहमीच पुढे होते. कोरोना संकटात सर्वात मोठे काम नीलेश लंके यांनी केले. लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली मात्र त्यांचे कार्यकर्ते कधीही हुरळून गेले नाहीत. खासदारांची पत्नी म्हणून राणी लंके यांची ओळख नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. माधवरावांच भरकटलेलं मोठ जहाज भरकटले होते. मात्र ते पुन्हा जागेवर आले. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता ग्रामपंचायतीच्या निवडणूकीप्रमाणे प्रचार करावा.
संभाजी रोहोकले
तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस
▪️चौकट
नगरची वाघिण विधानसभा गाजविणार
पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाने दिल्ली हलविली. आज राणीताई उमेदवार आहेत. राणीताईंमुळे मतदारसंघातील महिला घराबाहेर पडल्या आहेत. दुसरीकडे राज्यात महिलांचा अपमान केला जातो. महिलांचा अपमान थांबविण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी विधानसभेत पाठवायची आहे. नगर तालुक्याची वाघिण विधानसभा गाजविणार आहे.
ओंकार धावडे
▪️चौकट
नगर तालुक्याची लाडकी बहिण म्हणून एकशिक्की मतदान करा
टक्केवारी न सांगता विश्वासाने काम करा. नगर तालुक्यातील शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे काम करावे. नगर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी राणी लंके यांच्या पाठीशी आहेत. सर्वजण एकसंघपणे प्रचार करणार आहेत. सकाळी एक व रात्री एक असे होणार नाही. नगर तालुक्याची लाडकी बहिण म्हणून तालुक्याने एकशिक्की मतदान करावे.
वसंत ठोकळ