कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
अहमदनगर – अहमदनगर येथील शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थान विश्वस्तसंस्था यामध्ये सध्या काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.
शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थान ट्रस्ट मधील कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुजय विखे- पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विखे- पाटील म्हणाले की, यापूर्वीही संस्थानामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये घेण्यात आले होते. त्याच धर्तीवर सध्या कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्यांना सामावून घेण्यात यावे. यासाठी आवश्यक आहे तिथे विधी व न्याय विभागाची मदत घेण्यात यावी.
कोविड काळात साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद नेण्यास सुरक्षेच्या कारणास्तव बंदी करण्यात आली होती. मात्र आता श्रींचे समाधी मंदिरात हार, फुले आणि प्रसाद न्यायला परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतही लवकरच विचार करण्यात येईल असेही विखे- पाटील यांनी सांगितले.