ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला निषेध
नगर । प्रतिनिधी
न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्राथना केली.
नगर मधील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे, कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहिरपणे निषेध करत असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.अॅड अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला.