ग्रामविकासाच्या बळावर पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्धार – प्रवीण कोठुळे

.

ग्रामविकासाच्या बळावर पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्धार – प्रवीण कोठुळे
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामे यशस्वीरीत्या मार्गी लावून लोकांचा विश्वास संपादन केलेल्या प्रवीण कोठुळे यांनी आता वाळकी जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शाळा, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले.
ग्रामपातळीवर विकासकामांची अंमलबजावणी करताना मिळालेला अनुभव आणि विकासाची स्पष्ट जाण यामुळेच मोठ्या स्तरावरही प्रभावी काम करता येईल, असा विश्वास प्रवीण कोठुळे यांनी व्यक्त केला आहे. पंचायत समिती स्तरावर संधी मिळाल्यास वाळकी गटातील प्रत्येक गावात विकासाचा वेग वाढवून शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
“विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे,” असे सांगत ग्रामपंचायतीच्या अनुभवाच्या जोरावर वाळकी गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे करून दाखवणार असल्याचे प्रवीण कोठुळे यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे वाळकी गटातील राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *