खा. लंके यांचा आपत्तीग्रस्तांना कृतीतून दिलासा
आपत्तीग्रस्तांना किराणा, चाऱ्याची मदत
अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अकोळनेर, वाळकी, खडकी, सारोळा कासार, भोरवाडी येथे मोठे नुकसान झाले असून खासदार नीलेश लंके यांनी या गावांना भेटी देत गरजूंना किराणा साहित्य तसेच जनावरांसाठी चाऱ्याची मदत करत कृतीतून दिलासा दिला. दरम्यान, झालेल्या नुकसानीची आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत मिळावी अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली.
खासदार लंके यांच्या या दौऱ्यात बाळासाहेब हराळ, योगीराज गाडे, राजू भगर, नितीन पवार, वसंत गरूड, अरूण जाधव, सचिन शिंदे, बहू गहिले, सुहास कासार, संदीप बोठे, दिलीप भालसिंग, सागर कासार, ज्ञानेश्वर लंके यांचा समावेश होता.खा. लंके यांच्या दौऱ्यामध्ये महसूल, पाटबंधारे, महावितरण, कृषि व इतर विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
▪️चौकट
वाळकी
वाळकी येथे गंगाराम जुंदरे व परसराम जुंदरे यांच्या २५ गायी, ४० शेळया वाहून गेल्या. या वस्तीवरील पुलही वाहून गेला. फळबागा तसेच चाराही वाहून गेल्याने या कुटूंबावर मोठी आपत्ती कोसळली. खा. लंके यांनी जुंदरे वस्तीवर जात वस्तीवरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाणी सोडून दिले. तसेच चारा व किराणा मालाची व्यवस्था करून या परिवाराला दिलासा दिला.
▪️चौकट
खडकी
खडकी येथील नंदू रोकडे यांच्या आठ संकरीत गायांसह संपूर्ण चारा वाहून गेला. पावसाचे पाणी वाढल्याने या कुटूंबातील सदस्यांनी गोठयाच्या छतावर आसरा घेतला. खडकी येथीलच दीपक सयाजी कोठूळे व संतोष कोठूळे या दोघा भावांनी विजेच्या खांबाचा आधार घेत आपले प्राण वाचविले. त्यांची कांदा चाळ, मुरघास, संसार उपयोगी वस्तू, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य व इतर कागदपत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेले. ज्योती दीपक कोठूळे व कल्याणी कोठूळे, श्रध्दा कोठूळे यांची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा आधार घेत आपले जीव वाचविले.
▪️चौकट
सारोळा, अकोळनेर
सारोळा कासार येथे रस्ते उखडले असून स्मशानभुमीही वाहून गेली. अकोळनेर येथे तरवडी रोड, सारोळा मार्गे थोरात वस्ती, भोर वस्ती, फणसाचा मळा, जाधववाडी, मेहेत्रे मळा, भोरवाडी रस्ता वाहून गेला.


