28 जूनला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
मांडवे येथील पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी
नगर, दि.28-मांडवे (ता.नगर) येथील रामकृष्ण हरी आषाढी पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा मांडवे येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे दि. 28 जून रोजी प्रस्थान होणार आहे. दिंडी व्यवस्थापनाकडून पालखी प्रस्थान कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पालखी सोहळ्यात मांडवे पंचक्रोशीतील वारकरी, भाविक सहभागी होणाऱ आहेत. रामकृष्ण हरी दिंडीची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचे दिंडी कमिटीचे हभप अशोक रक्ताटे यांनी सांगितले. हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र मांडवे येथून दिंडी सोहळा मुख्य मंदिर प्रांगणातून 28 जून रोजी सकाळी 10 वाजता प्रस्थान ठेवणार आहे. दिंडीचा नऊ दिवसांचा प्रवास होणार आहे. प्रवासात नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम आणि व्यसन मुक्तीसाठी जनजागृती केली जाणार आहे. रामकृष्ण हरी दिंडी अतिशय शिस्तप्रिय असते. आषाढी पायी वारीसाठी तरुण वारकर्यांचा मोठा सहभाग असतो. दिंडी सोहळा हभप सतीश महाराज निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाार पडणार आहे. दिंडी प्रस्थानसाठी श्रीक्षेत्र मांडवे येथे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामकृष्ण हरी दिंडी कमिटीचे हभप अशोक रक्ताटे व माऊली भक्त परिवार यांनी केले आहे.
चौकट
दिंडी मुक्कामाची ठिकाणे
28 जूनला दिंडी सोहळा श्रीक्षेत्र मांडवे येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करेल. 28 जूनला आंबिलवाडी येथे पहिला मुक्काम, 29 जूनला कोकणगाव बोरुडे वस्ती, 30 जून डाकू निमगाव कुताळ वस्ती, 1 जुलै रोजी करमाळा एमआयडीसी, 2 जुलैला शेलगाव (वांगी) आदिनाथ कारखाना, 3 जुलैला टेंभूर्णी, 4 जुलै रोजी करकंब मुक्काम करून दिंडी 5 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे. 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार असून दुसर्या दिवशी बारस झाल्यानंतर दिंडी परत माघारी फिरणार आहे.


